Monday, February 6, 2012

आभास


झाकोळलेले नभ सारे 
कोंदट श्वास विसरून जा ,
गत आयुष्याच्या कोंदणातला
कटू आभास विसरून जा ...

मोकळे झाले क्षितीज पुढती
वाऱ्यासव तया कुशीत घे ,
विसरून सारे रुसवे फुगवे
मुक्त चांदणी खुशीत ये ..

भिजले ते प्रेमाचे अंकुर
टिपूस अळवाचे झेलून घे ,
मनस्वी कळ्यांचे स्वर्ग
हलकेच ओंजळीत फुलून दे ...

खुलले फुलले दर्प क्षणांचे
अंगावरती क्षणिक लाजून ,
तू हि भुलली धुंद मोहिनी
नववधू सम मनात सजून ...

Saturday, February 4, 2012

तो

तो परत आला होता
पाणी डोळ्यात आणून ,
तीच पूर्वीची निळाई
मनभर लेऊन ...

माफी पण मागितली त्याने
परत दान मागत होता ,
अगदी तसाच गुडघ्यात वाकून
निरर्थक याचना करत होता ..

आलं होतं पाणी
माझ्या पण डोळ्यात ,
पण बरंच पाणी वाहून गेलं
या मधल्या काळात ...

कुठे होतास जेव्हा
मला पावसात भिजायचा होतं
तुझा ओव्हरकोट  करून
तुझ्यातच विसावायचा होतं ...

नाही आठवण आली तुला
जेव्हा सोडून गेला होतास ,
माझा आत्मा तू जेव्हा
माझ्या पासून दुरावला होतास...

कुठं कुठं नाही शोधलं तुला
हळवी झाले होते तुझ्यासाठी,
देवाचा अगणित धावा करायचे
फक्त तू दिसण्यासाठी ...

मन हरलं प्रेम थिजल
का असा घात केला
मांडण्याआधी का उधळून असा
आयुष्याचा पाट गेलास ...

आता
आलास तसा परत जा
मी जगायला शिकलेय रे ,
तुझ्याशिवाय आयुष्य माझं
सजवायला लागलेय रे ...

सगळं सगळं बोलावसं वाटलं
उर फोडून रडावसं वाटलं,
सगळे शब्द ओठांतच थिजले
जेव्हा मन विवेकाला भेटलं ...

माझ्यातला माझं भावनिक द्वंद्व
त्याला कधी कळणार नव्हतं,
आणि त्याच्या कडे मन माझं
कधीही वळणार नव्हतं ...

Tuesday, January 31, 2012

सखये

हा चंद्र तुझा ग सखये
नित्य मला बोलावतो ,
तव रूप त्यात मी बघता
मन मयूर होऊनी फुलतो...

तव हृदयाचे ते स्फंदन
मम मनी तरंग उठती ,
एका स्मरणाने तुझिया
लक्ष प्राजक्त ओघळती...

१/८/२०११
प्राची (धुंद फुलपाखरू)...

Wednesday, January 25, 2012

कधी कधी



कधी कधी आयुष्याचे शब्द
साठवून ठेवायचे असतात
न फुटणारे शब्दही कधी
बोलून दाखवायचे असतात ...

मुकेपणी निपचित गिळून
घ्यायचे असतात शब्द ,
डोळ्यानेच बोलायचे
होऊन निःशब्द ...

कधी स्वतःच सजवायचा असतो
स्वप्नमहाल स्वतःचा ,
कटू - गोड क्षणांसावे स्वीकारायचा
दिवस उद्याचा ...

कधी चेतवायची असते
ध्येयाची आग उरात ,
झपाटून घ्यायचा असतं मग
स्वतः ला  स्वप्न रंगात ...

कधी पचवायचे असतात
सगळे सल नकळत ,
मोठं हृदय करायचं
कधी कळत कधी नकळत ...

कधी बघायचे खेळ नियतीचे
शिवलेल्या ओठांनी ,
सहन करायचे संकटांचे मारे
गारठलेल्या शब्दांनी ...

कधी हसायचे दुःखातही
खळी गाली लेऊन ,
स्वतःच फुंकर घालायची जखमेवर
स्वतःच सर्वस्व होऊन ...


- प्राची (धुंद फुलपाखरू)
०८/१२/२००८

गूढ


पिवळ  उन्हं  पिवळी फुलं
सभोवार पसरली आहेत ,
एकाला झेलत एकाशी खेळत ...

प्रत्येक कृतीला संदर्भ आहे
निर्माण झालेल्या वलयांचा ,
जी माझ्यातूनच निघतात नि
माझ्यातच संपतात ...

उन्हं शक्ती देतंय नि फुलं स्फूर्ती देताय
तोंड द्यायला प्रत्येक क्षणाला ,
दिशा देताय प्रत्येक घटनेतला
आनंद उपभोगायला ...

मनाची गुंतागुंत अधिक गहिरी होतेय
त्याची उकल या हातांत नाही,
कुठून तरी अभिमन्यू डोकावतोय
पण, त्याचीही हतबलता बघवत नाही ...

कुठून तरी बारीकशी तिरीप येते
आत्मानंद अचानक समाधानी होतो ,
अज्ञाताच्या हाती हात देताना
अचानक शंकेचे समाधान होते ...

कानावर कर्कश गोष्टी आदळतात

ऊठ, पळ, आकाशाला कवेत घेऊन बघ
आत्मा जागृत करून मनःचक्षु उघड

सगळं  तुला जवळच दिसेल
हवे ते अधाशाप्रमाणे चाखून बघ,
डोळे उघड नि आयुष्याकडे डोळसपणे बघ
नक्की जग तुझ्या कवेत असेल ...
 
-प्राची(धुंद फुलपाखरू)
२३/०९/२००६

Sunday, January 22, 2012

एकच प्याला


अस्वस्थ जीवनाची
उद्वस्थ ती मदार ,
काळजात बेभानपणे खुपते
कर्माची नांगी कट्यार ...

सत्यासत्य बुडबुडे बनून
अस्तित्वाच्या विषारी हवेत विरतात ,
अस्वस्थतेच्या माथी भोग मारून
निःश्वासाचे घोट गळा उरतात ...

काळीज जळत असतं
अगणित चुकांपाई  ,
खासे बरबटून तळमळत असतं
कोसळताना ठाई ठाई ...

नशाही तशी चढत नाही
मैफिल हि कधी रंगत नाही ,
रंगला मनाचा विडा तरी
सुरताल हि काही साधत नाही ...

डोळे झिंगत जातात
आत्म्याचा चेंदामेंदा होतो ,
परिस्थिती इतका हतबल करते कि
विचारचक्राचाही पेंद्या होता ...

कृष्ण, गीता, अर्जुन, तत्वज्ञान
सारे सारे मित्थ्य वाटतात ,
मग एकच प्याला शिल्लक राहतो
त्यातच सारे स्वर्ग दाटतात ...

जाणीवा भोग बनून
 भोग्याच्या गळा सरसावतात ,
तप्त लाव्हेही त्यापुढे मग
आपले रौद्ररूप आवरतात ...

याही बेधुन्दीत हाती
माती देखील उरत नाही ,
मधुशाळा पाघळून देखील
समाधान कुठशी कळत नाही ...

हृदय जळत असतं
मन तळमळत असतं ,
शरीराचं कणनकणही मग
मृत्यू अभावी भळ
भळत असतं ...

विचारांचा कोंब कुजत असतो
नवा बळी पुन्हा सजत असतो ,
मनातला भेकड माणूसच
क्षणोक्षणी बुजत असतो ...

मदमस्तीचा बाज कोसळून पडतो
शेवटला मुजरा करता करता ,
नवख्याचा साज ढळून जातो
आखरीचा निरोप देता घेता ...  

०८/०८/२००७
प्राची (धुंद फुलपाखरू)

गुलाब

तू दिलेल्या गुलाबाचा
रंग अजुन ताजाच होता, 
तुझ्या डोळ्यात अश्रु बघताना
तो कोंडलेला श्वास माझाच होता
..



Saturday, January 21, 2012

ईश्वर



सुखात धुंद झालो तरी
तुला विसरलो असे नाही |
दुःखात रडलो म्हणून तुला
सारखे आठवतो असे नाही ...

तू माझ्या पाठीशी आहे
याचे मला भान आहे ...

तू मला तरशील वा मारशील
हा विचार नाही मला स्पर्शत |
प्रत्येक कर्म करताना तुला
नतमस्तक व्हावे एवढेच मला माहित ...

तू माझे बोट धरत नाहीस तर
मला चालायला शिकवतोस |
तुझी एकच विचारसरणी नसून  तू
मला स्वतंत्र जगायला शिकवतोस ...

तुझ्या पायाशी लीन होणे
म्हणजे काय ते नाही ठाऊक |
प्रत्येक कामाला, श्वासाला तुझे रूप
आठवावे ही माझी घाऊक समज ...

ईश्वर म्हणून मला तू कधी
वेगळा वाटला नाहीस |
माझ्या स्वत्वात तुझं अस्तित्व
याहून वेगळं रूप तू थाटल नाहीस ...

नोव्हेंबर २००६
प्राची (धुंद फुलपाखरू)...

संध्याकाळ


ती धुंद संध्याकाळ
श्रावणात चिंब झाली |
अश्रू गाली ओघळता
मनी हुरहूर सोडून गेली ...

श्वास उरला होता

ओल्या गालांवर माझ्या |
आणि निरव शांतता
निर्जन आयुष्यात माझ्या ...

मनाची गुंत गहिरी झाली होती

हातांची पकड घट्ट झाली होती |
तुझ्या पासून दूर जाताना
तुझी मिठीही ओली झाली होती...

श्रावणधारा धारीनीचे दुःख

रिमझिम ओलावत होत्या |
आभाळ मायेच्या मनीचे सल
हलकेच पाझरत होत्या ...

ती भेट आपली शेवटची

चुकुनही वाटलं नव्हतं |
ती हतबल नजरानजर
अन नभ माथ्यावर फाटलं होतं ...

विरत जाणारा श्वासच

शेवटला राहणार होता |
खोल जाणारा आवाज
लाटनसवे दुरावणार होता ...

क्षण सैरावैरा धावले

कालपलट दूर लोटून |
अरे कितीसा वेळ झाला
असा तुला मला भेटून ...


१२/०१/२०११
प्राची (धुंद फुलपाखरू)...







 

मोजकेच क्षण ते...



मोजकेच क्षण ते
मोजकाच किनारा |
पिंजऱ्यात बंद तो
अबोल घोगरा वारा... 

मनाचीच चिंता
मनाचेच शल्य |
रक्तबंबाळ चेतना
अन अधु ते प्राबल्य..

बंदिस्त निर्मिती त्या
बंदिस्त ते नजरे |
घाव घालण्याजोगे
अजाणते किनारे...

तृप्त त्या कहाण्या
अतृप्त ते विखारे |
क्षणी सांभाळुनी रहा तू
कोवळ्या मना रे ...

  जानेवारी २००४
प्राची (धुंद फुलपाखरू)

Thursday, January 19, 2012

तुझा-माझा पाऊस

पाऊस माझं थेंबांच गीत
पाऊस माझं जीवन संगीत |
पाऊस म्हणजे तुझ्या माझ्या
हळुवार स्पर्शातली लाजरी प्रीत...
पावसाचं अचानक बरसणं
ओंजळीत तुझ्या माझे स्वर्ग साठणं |
केसांतून तुझ्या माणक ओघळताना
माझं हसणं नी तुझा रुसणं ...
 माझा पाऊस शांत असतो
चहासोबत सजणारा |
तुझा पाऊस केवळ अवखळ
शब्दा-शब्दांत पाझरणारा ...
मनी दाटलेल्या पावसाचं
माझा अकल्पित नात वाटतं |
तुझ्या-बरोबरच त्याचंही
रोज नवा रुपडं भेटतं ...
तुझ्यासोबत पाऊस माझा
हास्याचा धबधबा असतो |
दुःख हलकेच सामावणारा
आनंदाचा सागर भासतो ...
कधी कधी कळतंच नाही
पावसात तू की तुझ्यात पाऊस |
मग मन हळूच म्हणत
प्रियेच्या उत्सवाला नजर नको लावूस ...
 
--जून 2011
प्राची (धुंद फुलपाखरू )

 

लपाछ्पी

पाऊस असाच बरसणारा
अचानक तुझी आठवण देणारा ।
हृदयाचा एक ठोका चुकला तरी
बोचरी आठवण पुन्हा जागवणारा..
 विजा अचानक कडाडतात    
जणू भावना हुंकार भरतात ।
नसलेल्या अस्तित्वाशी सरी
पुन्हा नव्याने झिम्मा घालतात...
ओल्या पावसाचे तुषार जणू
तुझ्या श्वासाची आठवण देतात |
ओंजळीतील पावसाचे थेंब
पुन्हा क्षणांचे मोती होतात... 
मातीचा गंधही अगदी तसाच
मनाचा मोगरा ताजा करतो |
हृदयाशी  माझ्या लपाछपी खेळताना
स्वत्वात माझ्या लाव्हा भरतो...
काचेच्या पल्याडचा अवखळ पाऊस
अल्याडच्या मनाशी हितगुज करतो |
तुझ्या सोबतच्या प्रत्येक स्वप्नात
मम मनीचे नवरंग भरतो ...
हे पावसाचं नेहमीचं असतं
मला गालात खुदकन हसवणं |
मग माझा सहजंच होतं
थेंबानसवे तुला विसरणं.. .


२४/१४/२०११
प्राची (धुंद फुलपाखरू )..