Monday, February 6, 2012

आभास


झाकोळलेले नभ सारे 
कोंदट श्वास विसरून जा ,
गत आयुष्याच्या कोंदणातला
कटू आभास विसरून जा ...

मोकळे झाले क्षितीज पुढती
वाऱ्यासव तया कुशीत घे ,
विसरून सारे रुसवे फुगवे
मुक्त चांदणी खुशीत ये ..

भिजले ते प्रेमाचे अंकुर
टिपूस अळवाचे झेलून घे ,
मनस्वी कळ्यांचे स्वर्ग
हलकेच ओंजळीत फुलून दे ...

खुलले फुलले दर्प क्षणांचे
अंगावरती क्षणिक लाजून ,
तू हि भुलली धुंद मोहिनी
नववधू सम मनात सजून ...

Saturday, February 4, 2012

तो

तो परत आला होता
पाणी डोळ्यात आणून ,
तीच पूर्वीची निळाई
मनभर लेऊन ...

माफी पण मागितली त्याने
परत दान मागत होता ,
अगदी तसाच गुडघ्यात वाकून
निरर्थक याचना करत होता ..

आलं होतं पाणी
माझ्या पण डोळ्यात ,
पण बरंच पाणी वाहून गेलं
या मधल्या काळात ...

कुठे होतास जेव्हा
मला पावसात भिजायचा होतं
तुझा ओव्हरकोट  करून
तुझ्यातच विसावायचा होतं ...

नाही आठवण आली तुला
जेव्हा सोडून गेला होतास ,
माझा आत्मा तू जेव्हा
माझ्या पासून दुरावला होतास...

कुठं कुठं नाही शोधलं तुला
हळवी झाले होते तुझ्यासाठी,
देवाचा अगणित धावा करायचे
फक्त तू दिसण्यासाठी ...

मन हरलं प्रेम थिजल
का असा घात केला
मांडण्याआधी का उधळून असा
आयुष्याचा पाट गेलास ...

आता
आलास तसा परत जा
मी जगायला शिकलेय रे ,
तुझ्याशिवाय आयुष्य माझं
सजवायला लागलेय रे ...

सगळं सगळं बोलावसं वाटलं
उर फोडून रडावसं वाटलं,
सगळे शब्द ओठांतच थिजले
जेव्हा मन विवेकाला भेटलं ...

माझ्यातला माझं भावनिक द्वंद्व
त्याला कधी कळणार नव्हतं,
आणि त्याच्या कडे मन माझं
कधीही वळणार नव्हतं ...