Saturday, January 21, 2012

ईश्वर



सुखात धुंद झालो तरी
तुला विसरलो असे नाही |
दुःखात रडलो म्हणून तुला
सारखे आठवतो असे नाही ...

तू माझ्या पाठीशी आहे
याचे मला भान आहे ...

तू मला तरशील वा मारशील
हा विचार नाही मला स्पर्शत |
प्रत्येक कर्म करताना तुला
नतमस्तक व्हावे एवढेच मला माहित ...

तू माझे बोट धरत नाहीस तर
मला चालायला शिकवतोस |
तुझी एकच विचारसरणी नसून  तू
मला स्वतंत्र जगायला शिकवतोस ...

तुझ्या पायाशी लीन होणे
म्हणजे काय ते नाही ठाऊक |
प्रत्येक कामाला, श्वासाला तुझे रूप
आठवावे ही माझी घाऊक समज ...

ईश्वर म्हणून मला तू कधी
वेगळा वाटला नाहीस |
माझ्या स्वत्वात तुझं अस्तित्व
याहून वेगळं रूप तू थाटल नाहीस ...

नोव्हेंबर २००६
प्राची (धुंद फुलपाखरू)...

संध्याकाळ


ती धुंद संध्याकाळ
श्रावणात चिंब झाली |
अश्रू गाली ओघळता
मनी हुरहूर सोडून गेली ...

श्वास उरला होता

ओल्या गालांवर माझ्या |
आणि निरव शांतता
निर्जन आयुष्यात माझ्या ...

मनाची गुंत गहिरी झाली होती

हातांची पकड घट्ट झाली होती |
तुझ्या पासून दूर जाताना
तुझी मिठीही ओली झाली होती...

श्रावणधारा धारीनीचे दुःख

रिमझिम ओलावत होत्या |
आभाळ मायेच्या मनीचे सल
हलकेच पाझरत होत्या ...

ती भेट आपली शेवटची

चुकुनही वाटलं नव्हतं |
ती हतबल नजरानजर
अन नभ माथ्यावर फाटलं होतं ...

विरत जाणारा श्वासच

शेवटला राहणार होता |
खोल जाणारा आवाज
लाटनसवे दुरावणार होता ...

क्षण सैरावैरा धावले

कालपलट दूर लोटून |
अरे कितीसा वेळ झाला
असा तुला मला भेटून ...


१२/०१/२०११
प्राची (धुंद फुलपाखरू)...







 

मोजकेच क्षण ते...



मोजकेच क्षण ते
मोजकाच किनारा |
पिंजऱ्यात बंद तो
अबोल घोगरा वारा... 

मनाचीच चिंता
मनाचेच शल्य |
रक्तबंबाळ चेतना
अन अधु ते प्राबल्य..

बंदिस्त निर्मिती त्या
बंदिस्त ते नजरे |
घाव घालण्याजोगे
अजाणते किनारे...

तृप्त त्या कहाण्या
अतृप्त ते विखारे |
क्षणी सांभाळुनी रहा तू
कोवळ्या मना रे ...

  जानेवारी २००४
प्राची (धुंद फुलपाखरू)

Thursday, January 19, 2012

तुझा-माझा पाऊस

पाऊस माझं थेंबांच गीत
पाऊस माझं जीवन संगीत |
पाऊस म्हणजे तुझ्या माझ्या
हळुवार स्पर्शातली लाजरी प्रीत...
पावसाचं अचानक बरसणं
ओंजळीत तुझ्या माझे स्वर्ग साठणं |
केसांतून तुझ्या माणक ओघळताना
माझं हसणं नी तुझा रुसणं ...
 माझा पाऊस शांत असतो
चहासोबत सजणारा |
तुझा पाऊस केवळ अवखळ
शब्दा-शब्दांत पाझरणारा ...
मनी दाटलेल्या पावसाचं
माझा अकल्पित नात वाटतं |
तुझ्या-बरोबरच त्याचंही
रोज नवा रुपडं भेटतं ...
तुझ्यासोबत पाऊस माझा
हास्याचा धबधबा असतो |
दुःख हलकेच सामावणारा
आनंदाचा सागर भासतो ...
कधी कधी कळतंच नाही
पावसात तू की तुझ्यात पाऊस |
मग मन हळूच म्हणत
प्रियेच्या उत्सवाला नजर नको लावूस ...
 
--जून 2011
प्राची (धुंद फुलपाखरू )

 

लपाछ्पी

पाऊस असाच बरसणारा
अचानक तुझी आठवण देणारा ।
हृदयाचा एक ठोका चुकला तरी
बोचरी आठवण पुन्हा जागवणारा..
 विजा अचानक कडाडतात    
जणू भावना हुंकार भरतात ।
नसलेल्या अस्तित्वाशी सरी
पुन्हा नव्याने झिम्मा घालतात...
ओल्या पावसाचे तुषार जणू
तुझ्या श्वासाची आठवण देतात |
ओंजळीतील पावसाचे थेंब
पुन्हा क्षणांचे मोती होतात... 
मातीचा गंधही अगदी तसाच
मनाचा मोगरा ताजा करतो |
हृदयाशी  माझ्या लपाछपी खेळताना
स्वत्वात माझ्या लाव्हा भरतो...
काचेच्या पल्याडचा अवखळ पाऊस
अल्याडच्या मनाशी हितगुज करतो |
तुझ्या सोबतच्या प्रत्येक स्वप्नात
मम मनीचे नवरंग भरतो ...
हे पावसाचं नेहमीचं असतं
मला गालात खुदकन हसवणं |
मग माझा सहजंच होतं
थेंबानसवे तुला विसरणं.. .


२४/१४/२०११
प्राची (धुंद फुलपाखरू )..

 



Friday, March 25, 2011

पाऊस


पाऊस श्रावणाचा
मनी मोरपिसारा दाटतो,
का हा
पाऊस सारखा
प्रियकर म्हणुन भेटतो..



रंग उडालेल्या मनाला
इंद्रधनू बनवतो हा पाऊस,
अश्रु
पुसून माझे
मनाला हसवतो हा
पाऊस ..

कधी रूसतो कधी फुगतो
तुझ्या सारखाच  हा पाऊस ,
घट्ट मिठीत घेताच
कसा फ़ुलतो हा पाऊस ..



ओठांना चुंबून माझ्या
कसा लाजवतो हा पाऊस ,
सर्वांगाला स्पर्शून माझ्या
शिरशिरी जागवतो हा पाऊस ..






कधी खेळतो लपाछपी अन
ढगाआड दडुन बसतो हा पाऊस ,
मग ऐकुन माझी आर्जवे
अविरत बरसतो हा पाऊस ..






कधी छेडतो कधी भुलवतो
नटवा भुरटा हा पाऊस ,
कुण्या काळचा प्रियकर,सर्वार्थाने
माझाच बनुन राह्तो हा पाऊस ..







जुलै २००९
प्राची (धुंद फ़ुलपाखरु)..